Thursday 30 November 2017

समुद्र ~ प्रथम पुष्प

समुद्र.... अनंत, अथांग, अगणित... सगळ्याच विशेषणांचा पिता. समुद्र म्हणजे फक्त पाणी नाही, पाण्याव्यतिरीक्त पण खुप काही असतो हा समुद्र. पायाखालून हुळहूळत सरकणारी वाळू आणि करोडो तुषारांसहीत अंगावर येणार्या लाटांपेक्षा पण कितीतरी पटींनी जास्त काहीतरी असतो हा समुद्र. समुद्र लांबी असतो, खोली असतो, विशाल असतो आणि प्रचंड गुढ असतो, हा समुद्र...! समुद्र अजरामर असतो, चिरतरूण असतो, चिरंजीव असतो, हा समुद्र...! समुद्र अंगावर घेवून, खोलात शिरून कळत नाही. आणि वाहतच राहीलं लाटांसोबत शेवटपर्यंत तरिही सगळा समुद्र मिळत नाही. नजरेत भरेल तितका समुद्र आतल्या समुद्रात साठवायचा असतो. जितका आठवेल तितका आठवायचा आणि जितका जमेल तितका पाठवायचा असतो, समुद्र...! समुद्र म्हणजे भाषा आहे आठवणार्याला ती कळायला हवी. समुद्र म्हणजे भावना आहे, ज्याला पाठवलिये त्याला मिळायला हवी. 
समुद्र म्हणजे हवाहवासा एकांत असतो करोडो चेहर्यांच्या गर्दीत सूद्धा. समुद्र म्हणजे सुंदर सोबत एकांतदेशीच्या हद्दीत सूद्धा. माझा समुद्र तूझा नसतो अन् तूझा समुद्र नसतो दुसर्या कोणाचा. एकच समुद्र सूद्धा प्रत्येक वेळी वेगवेगळा असतो प्रत्येकाच्या मनाचा. तूलाही कळेलच हा समुद्र, कधी समुद्रासारखा होवून बघ.
बाहेर दिसणारा हा अथांग समुद्र कधी तुझ्याही आत घेवून बघ.

No comments:

Post a Comment

"मोहिनी"

मोबाईलची रींग वाजली तेव्हा तो चहा पिण्यात तल्लीन झाला होता, अर्थात तो बरेचदा तसा चहा पिताना स्वतःला हरवून बसत असतो. वाफाळलेला चहाचा कप त्या...