Sunday 14 May 2017

अवकाळी ~ तृतीय पुष्प


जवळ मोबाइल वगैरे असल्यामुळे मैदानात थांबून भिजायची अनिवार ईच्छा मारावी लागली. जवळच्या घराच्या ओट्यावर गेलो. इथे मोबाईल प्रोटेक्ट करत भिजता येणं शक्य होतं. थोडक्यात मागच्या खिशात मोबाईल ठेवून समोरच्या बाजूने चिंब भिजण्यासाठी मी तयार झालो. मी कितीही ठरवलं तरी मन परत त्या सगळ्या जून्या आठवणींच्या गावात शिरतंय. या अवकाळी पावसाचे हेच तर दुष्परिणाम आहेत. तो पहिला पाऊस, पहिला मृद्गंध, ती गच्ची, ते भारावलेपण, त्या कोवळ्या वयात फुलून आलेल्या निरागस जाणीवा, आणि स्फुरलेल्या उत्कट, भावूक कविता... काळ तरी किती पुढे निघून जाईल..?? मन मात्र आहे तिथेच आहे. गुंतून पडलंय, हरवून गेलंय, अडकून राहीलंय त्याच स्मरणांच्या झोक्यांवर हिंदोळे खातंय. 
पाऊस येतो, जातो. आठवण ही येते नी जाते. प्रत्येक गोष्टींना क्रमाने समोर ठेवतो मी आणि अगदी तटस्थपणे पाहतो. ती भावूकता आता नाही. तो शहाराही आता येत नाही. बऱ्याच दिवसांपासून आकाश बदलतंय, आकाराने रंगाने, विचित्र सावल्यांचे खेळ होतात रात्री. पण मी या सगळ्यात सामील नसतो आजकाल .‎ मी हल्ली त्या नव्याने गवसलेल्या समुद्रात असतो. हां म्हणजे तळात नाही अगदीच. किनाऱ्यावर असतो. खोलात जावून मला समुद्र पहायचा नाहीचये. किनाऱ्यावर थांबून प्रत्येक लाटेला आत साठवण्याचं कसब जमतंय मला हळूहळू. प्रत्येक लाटेशी संवाद करतो मी. जमेल तसा, जमेल तितका किनाऱ्यावरूनच आत डोकवण्याचा प्रयत्न करतो. वारा थांबतोय आणि थेंब सूद्धा. मैदान भर पाणीच पाणी साचलंय. लाल गुलाबी सूर्य रंगाची उधळण करतोय आकाशात. इतका वेळ कुठेतरी आडोशाला थिजून बसलेले पक्षी किलबीलत भरारी घेतायेत. 
मैदानाच्या पाण्यात आणि पसरून राहीलंय सूर्यबिंब. जशी सगळी संध्याकाळ खाली उतरलीये. अचानक, अनपेक्षीत, अवकाळी जसा येतो तसा निघूनही जातो. मात्र जाताना त्या जून्या जाणीवांचा हळवा कोपरा मात्र हिरवा करून जातो.  

~ काव्याकाश 

No comments:

Post a Comment

"मोहिनी"

मोबाईलची रींग वाजली तेव्हा तो चहा पिण्यात तल्लीन झाला होता, अर्थात तो बरेचदा तसा चहा पिताना स्वतःला हरवून बसत असतो. वाफाळलेला चहाचा कप त्या...