Monday 8 May 2017

अवकाळी ~ द्वितीय पुष्प

वातावरणात अजून सूद्धा उष्मा आहे, घामाचा एक चुकार थेंब डोक्यावरून निघून मानेवरून घरंगळत खाली  येतोय, हे व्हायचंच त्रागा करून काही उपयोग नाही. संध्याकाळ अजून संध्याकाळ 'वाटायला ' अवकाश आहे. दोन एक क्षण मी जरासा अंतर्मूख झालो. या मैदानात खेळताना माझं लहानपण सरलंय. इथला मातीचा कण् ना कण मला परिचीत आहे. विटी दांडू, रवणा-पाणी पासून क्रिकेट पर्यंत सगळे खेळ खेळलोय इथे चेहरा लाल भडक आणि आख्खं शरीर घामेघूम होईस्तोवर. प्रत्येक ॠतुतल्या वेगळ्या खेळांच्या वेगळ्या आठवणी, हम्म असो.
अरे अचानक हे काय झालं..?? थंडगार वार्याची एक झुळूक चेहर्याला स्पर्शून निघून गेली आणि मी भानावर आलो. तितक्यात अजून एक झुळूक आली, कपाळावर खाली रुळणारे केस सैलसे वरी लहरू लागले. हा परमोच्च बिंदू वगैरे असतो आनंदाचा . अचानक फिल्ममधला हिरो असल्याच्या टाईपची फिलींग येते. शरिरावरची ,मनावरची मरगळ क्षणार्धात दूर होवू लागते. तिसरी झुळूक काहितरी अस्पष्टसं कुजबून गेली कानात. शब्द असंबद्धसे पण परिचीयाचे होते. हो..!! ही तीच माझी हरवलेली कविता, 'पहिला पाऊस'...!!
मी आकाशात पहिलं, काळेशार मेघ दाटीवाटी करत होते.  तूझ्या मोकळ्या सोडलेल्या केसांची आणि समूद्र किनारा भासणार्या, पापण्यांखाली मिरवणार्या भाग्यवान काजळाची आठवण येवून गेली क्षणात....!!! सोसाट्याचा वारा सुटलाच आहे, कुठल्याही अगदी कुठल्याही क्षणी तुटून पडतील हे मेघ मिलनासाठी आसुसलेल्या अवनीवर...!!
आहाहा.... थेंबांचं संगीत अखेर चालू झालंच. एका स्वर्गीय लयी मध्ये पहिल्या पावसाचा मल्हार चालू झाला. आणि हा सर्वांत सुंदर सुवास, मृद्गंध..!! रोमारोमातून भिनून अविट गोड शहारा
कसा सरसरून येतो या मृद्गंधामूळे..!!
दोघांच्या मिठीचा आवेग वाढतोय, विरहच इतका मोठा होता म्हणा.. मिलन हे असंच असणार..
अस्पष्ट ओळी हळूहळू स्पष्ट होतायेत....

"व्यापला मृद्गंधाने
हा आसमंत सारा
बेभान अन् बरसती
या शुभ्र रत्नगारा "

(क्रमशः)

~काव्याकाश

No comments:

Post a Comment

"मोहिनी"

मोबाईलची रींग वाजली तेव्हा तो चहा पिण्यात तल्लीन झाला होता, अर्थात तो बरेचदा तसा चहा पिताना स्वतःला हरवून बसत असतो. वाफाळलेला चहाचा कप त्या...