Sunday 21 April 2019

"मोहिनी"


मोबाईलची रींग वाजली तेव्हा तो चहा पिण्यात तल्लीन झाला होता, अर्थात तो बरेचदा तसा चहा पिताना स्वतःला हरवून बसत असतो. वाफाळलेला चहाचा कप त्याच्यासाठी अंतर्मूख करणार्या पोर्टलचं काम करतो. नोकरी सोडून तसा महिना उलटला होता आणि त्याला भरपूर एकांत, भरपूर वेळ मिळाला होता... फक्त स्वतःत हरवून विचार करण्यासाठी!

मोबाइलच्या रिंगने त्याची समाधी भंगली, त्याने मोबाइल पाहीला, त्याच्या असिस्टंट मॅनेजरचा, अंजलीचा कॉल होता. जॉब सोडतानाही अंजलीने त्याला सोडून न जाण्यासाठी खुपवेळा समजावण्याचा प्रयत्न केला होता, इतर कोणाहीपेक्षा खचितच जास्तवेळा. पण त्यावेळी तो बधला नव्हता. ती आता का कॉल करत असेल? कॉल घ्यावा की नको? अशा संभ्रमावस्थेतच त्याच्याकडून चुकून कॉल घेतला गेला.
हॅलो. तो
लिसन, जस्ट लेट मी नो दॅट यू आर कमींग हेअर अॅंड जॉयनींग अॉर नॉट?
जस्ट गीव्ह मी अॅंसर इन येस ऑर नो..
व्हॉट्स हॅपनींग यार, अॅम ट्राईंग टू कॉल यू सिंस लास्ट विक, अॅंड व्हॉट अॉल आय हॅड हर्ड ईज 'द पर्सन यू आर कॉलींग ईज नॉट ईन कव्हरेज एरीया"
व्हेअर द हेल यू आर मॅन, डोन्ट टेल मी दॅट यू वेंट टू हिमालया फॉर टेकींग संन्यास... अंजली.
अंजली मॅम.. तो.
व्हॉट? अंजली.
नाऊ यू कॅन ब्रीद.. तो.
प्लीज डोन्ट मेक फन हां, अॅम डॅम सिरीयस राईट नाऊ... टेल मी, व्हॉट्स योअर डिसीजन.. अंजली.
शॅल आय आस्क फॉर जस्ट फाईव्ह मिनीट्स, प्लिज.... तो.
ओके, ओन्ली फाईव्ह मिनीट्स, योर टाईम स्टार्टस नाऊ, अॅंड येह, अॅंसर मस्ट बी येस... अंजली.
आय विल राईट बॅक टू यू थॅंकस्.... तो.

त्याने उत्तर देण्यासाठी पाच मिनीट मागीतले खरे, पण त्या निर्णय घेण्यासाठी पाच जन्मही पुरले नसते. जर तो जॉब करायचाच असता तर त्याने तो सोडलाच नसता. पुर्ण टीम मध्ये त्याचा पर्फॉरमंस बेस्ट होता, स्टॅक्स हाय होते, आठवड्यात दोनदा तरी क्लायंट अप्रिशीएन मिळायचं. पण त्या ए.सी. मध्ये त्याचा जिव गुदमरायचा, त्या झगमगाटात त्याची दृष्टी अंधूक व्हायची, त्या खोट्या दिखाऊ 'कल्चर'मध्ये तो स्वतःचं अस्तित्व हरवत चालला होता. 
त्याने स्वतःला विचारलं, असं एक तरी कारण आहे का ज्यामूळे मी परत तिथे जावं जिथून वापस आलोय...??
.
काही क्षण स्तब्धतेत गेले, आणि अगदी अचानक त्याची स्पंदनं तिव्र झाली, त्याला जाणवलं की हृदय जोरजोरात धडका मारून बाहेर येऊ पाहतंय, हात-पाय गार पडलेत.
त्याच्या सर्वांगातून अचानक काहीतरी सरसरून गेलं आणि आलेल्या शहारा त्याला कारण सांगून गेला, वापस जाण्याचं कारण..
त्याने अंजलीला टेक्सट केला, 
"अॅम कमींग, विल बी एबल टू जॉईन डे आफ्टर टुमॉरो" 
.
~काव्याकाश
("मोहीनी" लघूकथेतून)

Thursday 30 November 2017

समुद्र ~ प्रथम पुष्प

समुद्र.... अनंत, अथांग, अगणित... सगळ्याच विशेषणांचा पिता. समुद्र म्हणजे फक्त पाणी नाही, पाण्याव्यतिरीक्त पण खुप काही असतो हा समुद्र. पायाखालून हुळहूळत सरकणारी वाळू आणि करोडो तुषारांसहीत अंगावर येणार्या लाटांपेक्षा पण कितीतरी पटींनी जास्त काहीतरी असतो हा समुद्र. समुद्र लांबी असतो, खोली असतो, विशाल असतो आणि प्रचंड गुढ असतो, हा समुद्र...! समुद्र अजरामर असतो, चिरतरूण असतो, चिरंजीव असतो, हा समुद्र...! समुद्र अंगावर घेवून, खोलात शिरून कळत नाही. आणि वाहतच राहीलं लाटांसोबत शेवटपर्यंत तरिही सगळा समुद्र मिळत नाही. नजरेत भरेल तितका समुद्र आतल्या समुद्रात साठवायचा असतो. जितका आठवेल तितका आठवायचा आणि जितका जमेल तितका पाठवायचा असतो, समुद्र...! समुद्र म्हणजे भाषा आहे आठवणार्याला ती कळायला हवी. समुद्र म्हणजे भावना आहे, ज्याला पाठवलिये त्याला मिळायला हवी. 
समुद्र म्हणजे हवाहवासा एकांत असतो करोडो चेहर्यांच्या गर्दीत सूद्धा. समुद्र म्हणजे सुंदर सोबत एकांतदेशीच्या हद्दीत सूद्धा. माझा समुद्र तूझा नसतो अन् तूझा समुद्र नसतो दुसर्या कोणाचा. एकच समुद्र सूद्धा प्रत्येक वेळी वेगवेगळा असतो प्रत्येकाच्या मनाचा. तूलाही कळेलच हा समुद्र, कधी समुद्रासारखा होवून बघ.
बाहेर दिसणारा हा अथांग समुद्र कधी तुझ्याही आत घेवून बघ.

Sunday 14 May 2017

अवकाळी ~ तृतीय पुष्प


जवळ मोबाइल वगैरे असल्यामुळे मैदानात थांबून भिजायची अनिवार ईच्छा मारावी लागली. जवळच्या घराच्या ओट्यावर गेलो. इथे मोबाईल प्रोटेक्ट करत भिजता येणं शक्य होतं. थोडक्यात मागच्या खिशात मोबाईल ठेवून समोरच्या बाजूने चिंब भिजण्यासाठी मी तयार झालो. मी कितीही ठरवलं तरी मन परत त्या सगळ्या जून्या आठवणींच्या गावात शिरतंय. या अवकाळी पावसाचे हेच तर दुष्परिणाम आहेत. तो पहिला पाऊस, पहिला मृद्गंध, ती गच्ची, ते भारावलेपण, त्या कोवळ्या वयात फुलून आलेल्या निरागस जाणीवा, आणि स्फुरलेल्या उत्कट, भावूक कविता... काळ तरी किती पुढे निघून जाईल..?? मन मात्र आहे तिथेच आहे. गुंतून पडलंय, हरवून गेलंय, अडकून राहीलंय त्याच स्मरणांच्या झोक्यांवर हिंदोळे खातंय. 
पाऊस येतो, जातो. आठवण ही येते नी जाते. प्रत्येक गोष्टींना क्रमाने समोर ठेवतो मी आणि अगदी तटस्थपणे पाहतो. ती भावूकता आता नाही. तो शहाराही आता येत नाही. बऱ्याच दिवसांपासून आकाश बदलतंय, आकाराने रंगाने, विचित्र सावल्यांचे खेळ होतात रात्री. पण मी या सगळ्यात सामील नसतो आजकाल .‎ मी हल्ली त्या नव्याने गवसलेल्या समुद्रात असतो. हां म्हणजे तळात नाही अगदीच. किनाऱ्यावर असतो. खोलात जावून मला समुद्र पहायचा नाहीचये. किनाऱ्यावर थांबून प्रत्येक लाटेला आत साठवण्याचं कसब जमतंय मला हळूहळू. प्रत्येक लाटेशी संवाद करतो मी. जमेल तसा, जमेल तितका किनाऱ्यावरूनच आत डोकवण्याचा प्रयत्न करतो. वारा थांबतोय आणि थेंब सूद्धा. मैदान भर पाणीच पाणी साचलंय. लाल गुलाबी सूर्य रंगाची उधळण करतोय आकाशात. इतका वेळ कुठेतरी आडोशाला थिजून बसलेले पक्षी किलबीलत भरारी घेतायेत. 
मैदानाच्या पाण्यात आणि पसरून राहीलंय सूर्यबिंब. जशी सगळी संध्याकाळ खाली उतरलीये. अचानक, अनपेक्षीत, अवकाळी जसा येतो तसा निघूनही जातो. मात्र जाताना त्या जून्या जाणीवांचा हळवा कोपरा मात्र हिरवा करून जातो.  

~ काव्याकाश 

Monday 8 May 2017

अवकाळी ~ द्वितीय पुष्प

वातावरणात अजून सूद्धा उष्मा आहे, घामाचा एक चुकार थेंब डोक्यावरून निघून मानेवरून घरंगळत खाली  येतोय, हे व्हायचंच त्रागा करून काही उपयोग नाही. संध्याकाळ अजून संध्याकाळ 'वाटायला ' अवकाश आहे. दोन एक क्षण मी जरासा अंतर्मूख झालो. या मैदानात खेळताना माझं लहानपण सरलंय. इथला मातीचा कण् ना कण मला परिचीत आहे. विटी दांडू, रवणा-पाणी पासून क्रिकेट पर्यंत सगळे खेळ खेळलोय इथे चेहरा लाल भडक आणि आख्खं शरीर घामेघूम होईस्तोवर. प्रत्येक ॠतुतल्या वेगळ्या खेळांच्या वेगळ्या आठवणी, हम्म असो.
अरे अचानक हे काय झालं..?? थंडगार वार्याची एक झुळूक चेहर्याला स्पर्शून निघून गेली आणि मी भानावर आलो. तितक्यात अजून एक झुळूक आली, कपाळावर खाली रुळणारे केस सैलसे वरी लहरू लागले. हा परमोच्च बिंदू वगैरे असतो आनंदाचा . अचानक फिल्ममधला हिरो असल्याच्या टाईपची फिलींग येते. शरिरावरची ,मनावरची मरगळ क्षणार्धात दूर होवू लागते. तिसरी झुळूक काहितरी अस्पष्टसं कुजबून गेली कानात. शब्द असंबद्धसे पण परिचीयाचे होते. हो..!! ही तीच माझी हरवलेली कविता, 'पहिला पाऊस'...!!
मी आकाशात पहिलं, काळेशार मेघ दाटीवाटी करत होते.  तूझ्या मोकळ्या सोडलेल्या केसांची आणि समूद्र किनारा भासणार्या, पापण्यांखाली मिरवणार्या भाग्यवान काजळाची आठवण येवून गेली क्षणात....!!! सोसाट्याचा वारा सुटलाच आहे, कुठल्याही अगदी कुठल्याही क्षणी तुटून पडतील हे मेघ मिलनासाठी आसुसलेल्या अवनीवर...!!
आहाहा.... थेंबांचं संगीत अखेर चालू झालंच. एका स्वर्गीय लयी मध्ये पहिल्या पावसाचा मल्हार चालू झाला. आणि हा सर्वांत सुंदर सुवास, मृद्गंध..!! रोमारोमातून भिनून अविट गोड शहारा
कसा सरसरून येतो या मृद्गंधामूळे..!!
दोघांच्या मिठीचा आवेग वाढतोय, विरहच इतका मोठा होता म्हणा.. मिलन हे असंच असणार..
अस्पष्ट ओळी हळूहळू स्पष्ट होतायेत....

"व्यापला मृद्गंधाने
हा आसमंत सारा
बेभान अन् बरसती
या शुभ्र रत्नगारा "

(क्रमशः)

~काव्याकाश

Thursday 4 May 2017

अवकाळी (प्रथम पुष्प)

अवकाळी

ज्यावर आपलं नियंत्रण अशा गोष्टींना भलतंच महत्व असतं आपल्या आयुष्यात, नाही का...? अचानक, अनपेक्षीत, असंभव कितीतरी नावांनी, विशेषणांनी संबोधन करतो आपण अशा गोष्टांचं. अशा अचानक घडणार्या गोष्टींची भितीही वाटत असते आपल्याला पण हो.., अशा गोष्टींचं प्रचंड कुतूहल, आकर्षण सूद्धा असतंच बरं. अचानक घडणार्या बर्याच  गोष्टींपैकी पाऊस अशी गोष्ट आहे जी जाम हवीहवीशी आणि गोड वगैरे वाटणारी आहे. कुठल्याही वेधशाळांनी किती जरी आडाखे बांधले आणि शक्यता वर्तवल्या तरी पाऊस तेव्हाच येतो, जेव्हा त्याला वाटतं. त्यातल्या त्यात पावसाळ्यातल्या पावसाहून जास्त लहरी असतो अवकाळी पाऊस...
उन्हाळ्यातली साधारण  दुपार असते, दिवसभर सूर्य आग ओकण्याचं आपलं कर्तव्य प्रामाणीकपणे बजावतोय, कार्यालयांतून - कचेर्यांतून कामाच्या बोजाखाली दबून गेलेल्या चाकरमान्यांच्या तोंडून गर्मीची गार्हाणी सुरूयेत. कुणीतरी गृहिणी स्वयंपाकघरात राबून घामाघूम झालीये, त्यात सुट्ट्या लागलेल्या मुलांकडून अजूनच वाढवून ठेवलेल्या कामाची तक्रार करतीये. कुणा सुखवस्तू घरात ए.सी. ,कुलर लावून दुपारच्या जेवणानंतर टि.व्ही. पाहत वामकूक्षी घेण्याची तयारी होतीये. कुणी फिरतीवर काम करणारे ऊन्हात सूद्धा कर्तव्य पार पाडतायेत. 
हळूहळू सूर्याला सूद्धा थकवा जाणवायला चालू झालाय, किती काम ते..!! एकटंच आपण तरी किती जळायचं..? चला आपल्या शिफ्ट चा टाइमिंग संपत आलाय, आता परतीचा प्रवास चालू करायला काही हरकत नाही.म्हणून सुरज मामू पश्चीमेकडे असलेल्या त्यांच्या बंगलो ( वीला, महाल काहीही म्हणा) कडे निघालेत....
(क्रमशः)
~काव्याकाश

Thursday 23 February 2017

संवाद



.कोणी काही सांगावं, कोणी काही ऐकावं. सांगणारा बेचैन हवा आणि ऐकणाराही तितकाच आतूर.ही बेचैनी, ही आतूरता घडवून आणते मग, खरा संवाद...!! या सवांदाला ना भाषेची गरज असते, ना शब्दांची. हा संवाद निखळ असतो, प्रवाही असतो, चैतन्याने अगदी ओतप्रोत भरलेला असतो कड्यावरून बेफाम कोसळणार्या, दिशा मिळेल तिकडे वाहणार्या, खळाळणार्या झर्यासारखा. भाषेला शब्दात कैद करून, त्यावर अलंकारांची बोजडं चढवून त्यातल्या निरागसतेला पुर्णपणे संपवून होतं फक्त, बोलणं, हा तो संवाद नसतोच.  संवादाला सिमा नसते, सरहद नसते, बंधनं नसतात. संवाद मोकळा असतो, असिम असतो, शाश्वत असतो. ढगांच्या गडगडाटाने पृथ्वीला आलेला शहारा संवाद असतो. विरहाने खवळलेल्या प्रचंड, प्रेमातूर लाटांनी किनार्याला कवेत घेताना केलेलं तुषारमीश्रीत भाषण संवाद असतो. पानगळीने शिणलेल्या, वसंतपालवीची वाट पाहणार्या, वैशाखवणव्यात कण-कण जळणार्या निष्पर्ण झाडांशी त्या घोंघावणार्या वार्याचा आपूलकीचा, सहानुभूतीचा सहवास संवाद असतो. त्या नवजात अजाण बालकाच्या निरागस डोळ्यातला दुध पीताना दाटलेला कृतज्ञता भाव संवाद असतो.
संवाद असिम असतो, निरामय असतो, अजरामर असतो, कधी 
अकल्पीत पण कधी सगळ्यात जास्त परिचीतही असतो संवाद.
(क्रमश:)
~काव्याकाश

"मोहिनी"

मोबाईलची रींग वाजली तेव्हा तो चहा पिण्यात तल्लीन झाला होता, अर्थात तो बरेचदा तसा चहा पिताना स्वतःला हरवून बसत असतो. वाफाळलेला चहाचा कप त्या...